वैजापूर, (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वैजापूर शहरात रविवारी (ता. ३१) विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील लोकमाता युवा प्रतिष्ठानच्यावतीने हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ९ वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता स्टेशन रोडवरील अहिल्यादेवी होळकर स्मारकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ वाजता येवला रोडवरील श्री चौरभद्र मंदिर येथून सांस्कृतिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करेल. नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.















